नगर : घरगुती वादातून नवऱ्याने बायकोला मारहाण झाल्याच्या अनेक घटना घडतात. मात्र बायकोने रागाच्या भरात नवऱ्याला अगोदर झाडूने मारहाण केली अन नंतर भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला केल्याची घटना केडगावच्या भूषणनगर मध्ये घडली आहे. याप्रकरणी पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना सोमवारी (दि. २९) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. त्यावेळी पती-पत्नी दोघेही घरी होते. पतीने पत्नीच्या पर्समधून पिस्ते काढून ते खाल्ले, त्याचा पत्नीला राग आला. संतप्त झालेल्या पत्नीने पतीला जोरजोरात शिवीगाळ केली. दोघांमध्ये वाद झाले. पत्नीने घरात पडलेल्या झाडूने पतीच्या हातावर व पाठीवर मारला.
जवळच भाजी कापण्याचा चाकू पडलेला होता. पत्नीने चाकू हातात घेऊन पतीच्या हातावर मारला. त्यास पतीने प्रतिकार केला. हात आडवा केल्याने पतीच्या हाताला जखम झाली, पत्नीने मारहाण केल्याने पतीने कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पत्नीविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.