अहमदनगर -आगामी विधानसभा निवडणुकीत मी श्रीगोंदेत लढावं, अशी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. किमान दौरा तरी करावा, असे त्यांना वाटत होते. पण, तसे केले असते, तर मी ज्या राहुरी मतदारसंघाचे नेतृत्व केले, तेथे चुकीचा संदेश गेला असता, तसेच ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते श्रीगोंद्यात आमच्या पक्षाचे (भाजप) आमदार आहेत. त्यामुळे तेथे लढण्याचा प्रश्न येतच नाही. मी राहुरीतूनच लढणार आहे, अशी भूमिका माजी मंत्री तथा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी मांडली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मुद्दे आणि प्रचार वेगळा असतो. लोकसभेचे गणित विधानसभेला चालेल, असे काही म्हणता येणार नाही. एक गोष्ट सांगतो, की यावेळी सर्वाधिक म्हणजे बारापैकी दहा आमदार हे महायुतीचे असतील, इतकेच मी सांगतो. या निवडणुकीत जिल्ह्याची समिकरणे बदललेली दिसतील. कोणत्याही परिस्थितीत मी राहुरीतून लढणार आहे आणि जिंकणार आहे, असा विश्र्वासही त्यांनी व्यक्त केला.याला अनेक कारणे आहेत. दूध, कांदा यांचे दर, संविधान बदलण्याची चर्चा असे अनेक कांगोरे आहेत. तथापि, लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका अत्यंत वेगळ्या असतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा परिणाम विधानसभेवर होणार नाही. विधानसभेला व्यक्तीकडे पाहून मतदान होते.
आपण यापूर्वी मोठी कामे केली आहेत. शिवाय सतत लोकांच्या संपर्कात आहे. त्यामुळे आगामी निवडणूक माझ्यासाठी सोपी आहे. फडणवीस यांच्या माध्यमातून मोठा निधी मिळत आहे. असे असले, तरी आगामी काळात फडणवीस यांना बोलावून भाजपमधील गट-तटाचे सुसुत्रीकरण करणार आहे. त्यांनी जिल्ह्यात यावे, कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मागणी आम्ही केली आहे, असे कर्डिले यांनी सांगितले.
राहुरी विधानसभा मतदारसंघात मी आमदार असताना अनेक कामे केली. पाणी योजना मार्गी लावल्या. आता मतदारसंघात लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे पाणी योजनांचाही विस्तार करण्याची गरज आहे. नवीन योजना वाढविणे. पंप, पाइपलाइन दुरुस्तीची गरज आहे. मतदारसंघातील रस्त्यांची मी चांगली कामे केली. त्यात आणखी कामे करण्याची गरज आहे. मी मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या संपर्कात आहे. पूर्वीपासून कार्यकर्ते विविध कामे घेऊन येतात. आजही तेवढीच गर्दी होते. यापूर्वी आपण केलेली कामे लोकं विसरले नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचे चांगले परिणाम दिसून येणार आहेत, असेही कर्डिले यांनी सांगितले.