कणकवलीचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी आज विधान भवनाच्या परिसरात मीडियाशी संवाद साधला. मुंबईत आजपासून 9 डिसेंबरपर्यंत विधानसभेच विशेष अधिवेशन सुरु झालं आहे. विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झालीय. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर निवडून आलेल्या आमदारांना शपथ देत आहेत. आमदारकीची शपथ घेण्याआधी नितेश राणे मीडियाशी बोलले. त्यांनी कणकवली विधानसभेतून विजयाची हॅट्ट्रीक केली आहे. महत्त्वाच म्हणेज प्रत्येकवेळी मतदारसंघातील त्यांचं मताधिक्कय वाढत गेलय. 2014 पासून ते विधानसभेत कणकवली विधानसभा मतदारसंघाच प्रतिनिधीत्व करत आहेत. 2014 मध्ये मोदी लाट असूनही ते कणकवलीतून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते.
“माझी तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक झालीय. कणकवली-देवगडच्या जनतेने माझी हॅट्ट्रीक घडवून आणली आहे. माझ्या मतदार संघातील हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणात मतदान केलं. हिंदुत्व आणि विकास या दोन प्रमुख मद्यांवर मी निवडणूक लढवली” असं नितेश राणे म्हणाले. नितेश राणे हे सतत हिंदुत्वाबद्दल बोलत असतात. आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करतात. आज मीडियाशी बोलताना स्वत:च्या विजयाबद्दल सांगताना त्यांनी हाच मुद्दा मांडला.
“मी कणकवली-देवगडमधून 58 हजार मताधिक्क्याने विजयी झालो. यात एकही मुस्लिम मत नाहीय. मी हक्काने सांगू शकतो. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारासंघाचा आमदार म्हणून निवडून आलो. विकासाची प्रक्रिया पुढची तीन वर्ष सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून कायम ठेवणार आहे” असं ते म्हणाले. “जनतेला माहीत आहे, टीका करणारे कावळे निवडणुकीपुरता असतात, आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, 365 दिवस 24 तास जनतेच्या सेवेसाठी हजर आहोत” असं नितेश राणे म्हणाले.