राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी नुकतीच ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, महाराष्ट्रात एनडीएला कमीत कमी २० जागांचं नुकसान होईल, तसेच ४ जूनच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे कुठेही दिसणार नाही, असं विधान त्यांनी केलं.
महाराष्ट्रातील निवडणुकीदरम्यान खरा मुद्दा हा असली शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणती हा होता. ज्यावेळी पाचव्या टप्प्यात मुंबईतील मतदान पार पडलं, त्यावेळी तर हे स्पष्ट झालं. या निवडणुकीत शिंदे पिछाडीवर होते. तसेच असली राष्ट्रवादीच्या मुद्द्यावरही शरद पवारांचा गट आघाडीवर होता”, अशी प्रतिक्रिया योगेंद्र यादव यांनी दिली.
“गेल्या निवडणुकीत एनडीएला एकूण ४२ जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत एनडीएन २२ पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, असा माझा अंदाज आहे. एनडीएचं ज्या २० जागांवर नुकसान होताना दिसत आहे. त्यापैकी भाजपाचे नुकसान केवळ ५ जागांचे आहे. तर १५ जागांचे नुकसान घटक पक्षांचे होणार आहे”, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना, “या निकालानंतर शिंदे आणि अजित पवार यांची परिस्थिती वाईट होईल. या निकालानंतर ते कुठेही दिसणार नाही. तुम्ही शोधत राहाल पण तुम्हाला ते सापडणार नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.