आता झारखंडमधील मंत्र्याचा मुलगा न्यायालयात शिपाई होणार आहे. ज्या मंत्र्यांच्या पीए आणि पीएसला महिन्याला लाखो रुपये मिळतात, त्या मंत्र्याचा मुलगा मात्र वर्ग चारची नोकरी करणार आहे. झारखंडमधील मंत्री सत्यानंद भोक्ता यांच्या मुलाचे शिपाई म्हणून सिलेक्शन झाले आहे. झारखंडमधील चतरा न्यायालयात १९ शिपायांच्या जागा निघाल्या होत्या. त्यासाठी मंत्री सत्यानंद भोक्ता यांचा मुलगा मुकेश कुमार भोक्ता यानेही अर्ज केला होता. त्याची मुलाखत झाली. त्यानंतर निकाल जाहीर झाला. त्यात तो १३ व्या क्रमांकावर आहे. एसटी प्रवर्गातून त्याची निवड झाली आहे. या जागेसाठी सत्यानंद भोक्ता यांचा पुतण्या रामदेव कुमार भोक्ता यानेही अर्ज केला होता. तो वेटींग लिस्टवर आहे. म्हणजे १९ उमेदवारांपैकी एखादा उमेदवार रुजू झाला नाही तर त्याला संधी मिळणार आहे.