५३ हजार विद्यार्थी देणार शिष्यवृत्तीची सराव परीक्षा
आज ३५८ केंद्रांवर आयोजन : निकाल सुधारण्यासाठी सीईओंचा अनोखा प्रयोग
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात सुधारणा व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची एक वर्ष आधीच तयारी करून घेण्यात येत आहे. त्यामुळे चौथी व सातवीच्या सुमारे ५३ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सराव परीक्षा रविवारी ३५८ केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.
दरवर्षी पाचवी व आठवीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा पुणे येथील परीक्षा परिषदेकडून घेतली जाते. मात्र त्यात २५ ते ३० टक्क्यांच्या पुढे निकाल जात नाही. त्यामुळे तिसरीपासूनच विद्यार्थ्यांची तयारी व्हावी या संकल्पनेतून सीईओ आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी विशेष पुस्तिकांची छपाई करण्यात आली. तिसरी, चौथी, सहावी, सातवीच्या प्रत्येकी ५, तसेच पाचवी व आठवीच्या प्रत्येकी १० सराव परीक्षा असे एकूण ४० सराव परीक्षांचे नियोजन करण्यात आले. त्यातील तिसरी, सहावीच्या प्रत्येकी ५ व पाचवी, आठवीच्या प्रत्येकी १० सराव परीक्षा घेण्यात आल्या आहेत.
आता चौथी व सातवीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन आरंभ’ परीक्षा रविवारी (दि. १०) तालुकास्तरावर परीक्षा केंद्र तयार करुन घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ३५८ परीक्षा केंद्रांवर तयारी करण्यात आली आहे.
यात चौथीचे ४२ हजार ८१०, तर व सातवीचे १० हजार २३८ असे एकूण ५३ हजार ४८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
१००० हजार विद्यार्थ्यांची होणार निवड
मिशन आरंभ परीक्षेच्या उत्तरपत्रिका मशिनद्वारे तपासणी करुन परीक्षेनंतर दहा दिवसांतच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या परीक्षेमधून चौथी व सातवीमधून प्रत्येकी ५०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन पुढील वर्षी हे विद्यार्थी अनुक्रमे पूर्व उच्च प्राथमिक (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र होणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ शिक्षकांमार्फत ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहे.