नगर – ईडीने राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याची जमीन जप्त केली आहे. तनपुरे यांनी अहमदनगर येथील एका आंदोलनात ‘आम्ही ठरवले तर भाजप नेत्यांचा कार्यक्रम करू शकतो’ असे सांगितले होते. त्या नंतर दोनच दिवसांत त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. या संदर्भात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली.
ते म्हणाले की, तनपुरेंवरील कारवाईची बातमी मी काल वाचली मात्र मला त्याविषयी जास्त माहिती नाही. मात्र तपास यंत्रणा कारवाई करत असेल तर तथ्य असल्या शिवाय कारवाई होणार नाही. त्यांना अन्याय वाटत असेल तर न्यायालयीन प्रक्रियेचा मार्ग खुला आहे. या संदर्भात न्यायालय योग्य तो न्याय करेल.
ते करेक्ट कार्यक्रम कशा बद्दल म्हणाले त्यामागे त्यांची भावना काय होती हे मी सांगू शकत नाही. कदाचित त्यांची भावना वेगळी असेल. लोकशाहीत मतदार हीच परमेश्वर असतात, असे असताना तुम्ही अशा पद्धतीने भाष्य करत असाल, कार्यक्रम लावू म्हणत असाल तर कोणाचा कार्यक्रम लावायला गेले आणि त्यांचा कार्यक्रम होऊन गेला. हे जनतेच्या मनात असल्याशिवाय होणार नाही.