यवतमाळ: कौटुंबिक वादातून मानसिक ताण आल्याने विक्रीकर सहाय्यक आयुक्तपदी असलेल्या अधिकार्याचा ऑगस्ट २०२० मध्ये येथे मृत्यू झाला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर उपजिल्हाधिकारी स्नेहा चंद्रशेखर उबाळे उर्फ स्नेहा शरदकुमार खंडाळीकर (३७), यवतमाळ यांच्यासह सात जणांविरुद्ध मानसिक व शारीरिक त्रास देऊन मृत्यूस प्रवृत्त केल्याबद्दल आज येथील लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
शरदकुमार सुधाकर खंडाळीकर (३२) रा. राज नगर नांदेड यांचा २५ ऑगस्ट २०२० रोजी मृत्यू झाला. त्यानंतर मृताचा भाऊ सुरेंद्र सुधाकर खंडाळीकर (२५), रा. नांदेड यांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून तक्रर दाखल केली. या तक्ररीची दखल घेतली गेली नाही. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनीही तक्ररअर्ज फेटाळला. जिल्हा व सत्र न्यायालयाने मात्र या अर्जाची दखल घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार लोहारा पोलिसांनी मृताची पत्नी उपजिल्हाधिकारी स्नेहा चंद्रशेखर उबाळे उर्फ स्नेहा शरदकुमार खंडाळीकर हिच्यासह मुंबई पोलिसांत कार्यरत अभिषेक चंद्रशेखर उबाळे (३०), अशोक खोळंबे (५६), मनीषा अशोक खोळंबे (५४), अक्षय अशोक खोळंबे (३०) सर्व रा. आपटेवाडी शिरसगाव बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, कपिल सातपुते (३३) आणि अंकिता कपिल सातपुते (३३), दोघेही रा. मुकुंदनगर, उल्हासनगर, ता. कल्याण जि. ठाणे यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.