शपथविधीसाठी 90 कि.मी.सायकल प्रवास, आमदार म्हणून फक्त 1 रुपये मानधन घेण्याची घोषणा

0
2003

पटियाला – नाभा येथील आम आदमी पक्षाचे आमदार गुरदेव सिंह देव मान यांनी पंजाब विधानसभेच्या शपथग्रहण समारोहात सहभागी होण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली. ते नाभा ते चंडीगड असा तब्बल 90 किमीचा सायकल प्रवास करून शपथविधी सोहळ्याला हजर झाले. विधानसभा हलका येथून शपथग्रहण समारोहाच्या स्थळावर पोहोचण्यासाठी स्वत: सायकल चालवून 90 किमी प्रवास करणारे हे एकमेव आमदार असतील. सध्या गुरदेव सिंह यांची जोरदार चर्चा रंगली आहे. देव मान हे गेल्या 7 वर्षांपासून आम आदमी पक्षासोबत जोडले गेले आहेत. सन 2017 च्या विधानसभा निवडणुकांवेळीही नाभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार राहिले होते. मात्र, काँग्रेस उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. पण, यंदा त्याच काँग्रेस उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करत ते आपचे आमदार बनले आहेत. विशेष म्हणजे विजयानंतरही त्यांनी घोषणा केली होती, की नाभा मतदारसंघात आपण सायकलवर फिरुनच लोकांच्या समस्या जाणून घेणार. सायकलवरुन फिरल्याने लोकं कुठेही आपणास भेटू शकतील, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासोबतच, केवळ महिना 1 रुपये मानधन स्वरुपात पगार घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.