नवी दिल्ली – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास होळी आणि दिवाळीला मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय विद्यार्थिनींना स्कुटी देणार असल्याचीही घोषणा राजनाथ सिंह यांनी केली. उत्तर प्रदेशमधील मनकापूरमध्ये एका सभेत ते बोलत होते. मनकापूर गोंडा जिल्ह्यात येतं.
मनकापूरमधून भाजपाने आपल्या विद्यमान आमदार रमापती शास्त्री यांच्यावरच विश्वास टाकत तिकिट दिलं आहे. शास्त्री सध्याच्या योगी सरकारमध्ये मंत्री देखील आहेत. राजनाथ सिंह यांनी जनसभेला संबोधित करताना “दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला तेव्हा सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यात आला. भाजपा देशाला निराश करणार नाही. भाजपा देशाच्या सन्मानासोबत कोणतीही तडजोड करत नाही. ब्रह्मोसची निर्मिती उत्तर प्रदेशमध्ये होईल. हे एक असं क्षेपणास्त्र आहे ज्याला शत्रू घाबरतो” असं म्हटलं आहे.






