लंके प्रतिष्ठानच्या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
भारतातील पहिली शेतकरी व आरोग्य समर्पित स्पर्धा
५०० शेतकरी सहभागी होणार
अहिल्यानगर : प्रतिनिधी
खासदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दि. ९ मार्च रोजी नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या खासदार मॅरेथॉन २०२५ साठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ही मॅरेथॉन भारतातील पहिली शेतकरी व आरोग्य समर्पित स्पर्धा ठरणार असून सुमारे ५०० शेतकरी या स्पर्धेत सहभाग नोंदविणार आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पूर्वी विधानसभेत व सध्या संसदेत आवाज उठविणारे खा. नीलेश लंके हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असतात. आरोग्याच्या विषयावरही खा. लंके यांची सजगता सर्वश्रुत असून त्यांच्या या उपक्रमांना पाठींबा देण्यासाठी, शेतकऱ्यांचे हित अधोरेखित करण्यासाठी आम्हीही या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहोत अशा भावना सहभागी शेतकऱ्यांनी नोंदविल्या.
ही मॅरेथॉन स्पर्धा रविवार दि.९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता नगर-कल्याण महामार्गावरील द्वारका लॉन्स येथून सुरू होणार असून केडगांव बायपास मार्गे पुन्हा द्वारका लॉन्स येथे सांगता होईल.५ किमी आणि १० किमी अशा या स्पर्धेत १२ वर्षावरील पुरूष व महिलांना धावण्याची संधी आहे. याशिवाय महिला, १२ वर्षाखालील मुले तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठी २.५ किमी वॉकथॉनचेही आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी व आरोग्यासाठी समर्पित या मॅरेथॉन भारताच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेला प्रचंड जनाधार मिळत असल्याचे चित्र आहे. कृषि क्षेत्रातील अडचणी, शेतकऱ्यांचे योगदान आणि त्यांना आवष्यक असलेले समर्थन याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम एक महत्चाचा टप्पा ठरणार आहे.