वाईन शॉपचा परवाना काढून देण्याच्या बहाण्याने घातला गंडा,तोतया अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल!

0
465

नगर- उत्पादन शुल्क विभागातून अधिकारी बोलत असल्याचे भासवत वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची 8 लाख 86 हजार 800 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोतया उत्पादन शुल्क अधिकार्‍यांवर नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नानासाहेब आत्माराम खाडे (वय 35, रा.डोळेवाडी, राहुरी, ता.जामखेड) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी खाडे हे शेतकरी असून त्यांना 8584874059 तसेच 7699923809 व 8811801395 या तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरुन दि.9 ऑगस्ट 2021 ते 14 मार्च 2022 या कालावधीत अनेकदा उत्पादन शुल्क विभागातून बोलत असल्याबाबतचे फोन आले. त्यांना कमी खर्चात वाईन शॉपचा परवाना काढून देण्याचे अमीष या मोबाईलधारक तोतया उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी दाखवले. त्यांनी व्हॉटस्‌ऍपव तसेच मेल आयडीवर खोटे व बनावट कगदपत्र पाठवून फिर्यादी खाडे यांचा विश्वास संपादन केला. उत्पादन शुल्क विभागाचे लेटरपॅड तसेच त्यावरील शासकीय भाषेतील मजकूर यामुळे खाडे यांचा सदर व्यक्ती खरोखरच उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आहे असा समज झाला.
या तिघा भामट्यांनी खाडे यांना वेळोवेळी प्रोसेसिंग फी, रजिस्ट्रेशन, शासकीय शुल्क असे विविध कारणे सांगत ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. या कालावधीत खाडे यांनी तब्बल 8 लाख 86 हजार 800 रुपये ऑनलाईन पाठविले. मात्र मार्च 2022 नंतर सदरील भामट्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सदरचे तिनही मोबाईल बंद झाले. बरेच दिवस त्या तीन व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही खाडे यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर त्यांनी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात तीन मोबाईलधारक तोतया उत्पादन शुल्क अधिकार्‍यांविरुद्ध भा.दं.वि.क. 419, 420, 468 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे करत आहेत