अहमदनगर- नगर शहरासह जिल्ह्यातून दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना फुस लावून पळवून नेल्याच्या घटना मंगळवारी (दि.23) घडल्या आहेत. यातील एका मुलीला नगर शहरातील कल्याण रोडवरुन तर दुसरीला बेलवंडी (ता.श्रीगोंदा) शिवारातून पळवून नेण्यात आले आहे.
नगर शहरातील कल्याण रोडवर राहणार्याो 16 वर्षिय मुलीला मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी अमीष दाखवून घरासमोरुन पळवून नेले आहे. याबाबतची फिर्याद त्या मुलीच्या वडीलांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भा.दं.वि.क. 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शिवारात असलेल्या शिंदेवाडी येथे घडली आहे. तेथील 16 वर्ष 11 महिने वय असलेल्या मुलीला सुरज राजू साळवे (रा.चोभेवाडी, बेलवंडी) या युवकाने फुस लावून राहत्या घरापासून मोटारसायकलवर बसवून पळवून नेले आहे. ही घटना सामवारी (दि.22) रात्री 10.30 ते मंगळवारी (दि.23) सकाळी 6.30 या दरम्यान घडली आहे.
याबाबत मुलीच्या वडीलांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी सुरज साळवे याच्याविरुद्ध भा.दं.वि.क. 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.






