महसूल विभागाच्या पथकावर जमावाचा हल्ला,नगर तालुक्यातील घटना

0
836

विना परवाना गौण खनिज उत्खनन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई साठी गेलेल्या नगर तहसील कार्यालयातील महसूल पथकावर अवैधरीत्या डबर चोरी करणाऱ्या जमावाने हल्ला करत मारहाण केल्याची घटना नगर तालुक्यातील कापूरवाडी ते पिंपळगाव उज्जैनी रोडवर गुरुवारी (दि.२०) रात्री १० च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी २० ते २५ जणांच्या जमावावर भिंगार कँम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महसूल पथकातील बुरूडगाव येथे तलाठी म्हणून नियुक्तीस असलेले गणेश बबनराव आगळे (रा. गोकुळ नगर, भिस्तबाग,अहमदनगर) यांनी भिंगार कँम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांच्या आदेशाने तलाठी आगळे व मह्सुलचे पथक कापूरवाडी (ता.नगर) शिवारात विना परवाना गौण खनिज उत्खनन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई साठी गुरुवारी (दि.२०) रात्री जात होते. कापूरवाडी ते पिंपळगाव उज्जैनी रोडवर रस्त्यापासून ७० ते ८० मीटर लांबीवर त्यांना एक लाल रंगाचा ब्लास्टिंग ट्रॅक्टर दिसला. त्याच्या शेजारी एका पोकलेन मशिनच्या सहाय्याने विना क्रमांकाच्या ढंपर मध्ये अवैधरीत्या डबर भरले जात असल्याचे दिसून आल्याने सदर पथकाने तेथे जावून ते तिन्ही वाहने ताब्यात घेतले. त्यावेळी तेथे सुदर्शन संभाजी भगत, संभाजी गोवर्धन भगत (दोघे रा.कापूरवाडी), चांगदेव गोवर्धन आढाव (रा. पिंपळगाव उज्जैनी), युवराज धाडगे याच्यासह २० ते २५ जणांचा जमाव आला व त्यांनी महसूल पथकाला शिवीगाळ करत मारहाण केली व सदर पथक करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.

या फिर्यादी वरून भिंगार कँम्प पोलिसांनी २० ते २५ जणांच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातील एक संभाजी गोवर्धन भगत यास शुक्रवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.