adcc bank… शेतकर्यांची कामधेनू असणार्या जिल्हा बँकेने शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पीक कर्जाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कर्ज मर्यादा एकरी वीस हजारावरून तीस हजार करण्याबाबत सर्व संचालकांनी सुचना केल्या आणि त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याचे श्रेय कोणा एका संचालकाला नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हा बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांनी दिले आहे. पीक कर्जाची मर्यादा आपल्या सुचनेनुसार वाढविल्याची माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली होती. त्यास अध्यक्ष उदय शेळके यांनी पत्रक काढून उत्तर देताना श्रेयवादाचे खंडण केले.
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत शेतकर्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने एकरी कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा विषय संचालकांनी मांडला. पीक कर्जाच्या जोडीने पशुधनासाठीच्या कर्जाचा विषयही मांडला गेला. शेतकरी हिताचे निर्णय जिल्हा बँकेने सातत्याने घेतले असून यापुढच्या काळातही बँकेची तीच भूमिका राहणार असल्याचे स्पष्टीकरण बँकेचे अध्यक्ष ऍड. शेळके आणि उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिले.
शेतकरी हिताचे निर्णय घेण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायमच आम्हाला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेत कामकाज केले जात आहे. पीक कर्जाची एकरी मर्यादा वीस हजाराहून तीस हजार करण्याचा निर्णय त्यामुळेच आम्ही सर्व संचालकांच्या मागणीनुसार आणि चर्चेनुसार घेतला असल्याचे अध्यक्ष ऍड. शेळके यांनी सांगितले. बँकींग काय असते आणि बँक सभासद, शेतकर्यांच्या हिताने कशी चालवली जाते याची माहिती आमच्या नेत्यांसह आम्हाला असल्याचा टोलाही शेळके यांनी लगावला.






