दोन गटांत हाणामारी 10 जणांवर गुन्हा दाखल, नगर तालुक्यातील घटना….

0
36

घरासमोर असलेले दगड काढण्याच्या वादातून शिराढोण (ता. नगर) शिवारात दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (दिनांक 17 एप्रिल) सकाळी घडली. दोन्ही गटांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

भाऊसाहेब नामदेव थोरात (वय 42) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ तात्याबा वाघ, हरी मोहन वाघ व अरूण तात्याबा वाघ (सर्व रा. शिराढोण ता. नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोरात यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी घराच्या पायर्‍याकरीता मुरूम टाकण्याचे काम करत असताना सोमनाथ तेथे आला. त्याने दगड काढण्यास सांगितले. दरम्यान फिर्यादी यांनी त्याला कामात असल्याचे सांगून नंतर दगडे काढतो असे सांगितले. त्याचा सोमनाथला राग आल्याने त्याने इतरांच्या मदतीने भाऊसाहेब यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

याप्रकरणी पोलिसांनी मारहाण, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील करीत आहेत. सोमनाथ तात्या वाघ (वय 25 रा. शिराढोण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब थोरात, रोहित भाऊसाहेब थोरात, गौरव बबन थोरात, तुषार जाकू थोरात, बबलू पंडित थोरात, प्रदीप भगवान थोरात (सर्व रा. माळवाडी, शिराढोण) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघ यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी दुचाकीवर माळवाडी वस्तीतून रोडने सोलापूर रोडकडे जात असताना भाऊसाहेब थोरात याला त्याच्या घरासमोर ठेवलेले दगडे काढून घेण्याचे सांगितले असता त्याने शिवीगाळ करून इतरांच्या मदतीने मारहाण केली आहे. जखमी वाघ यांनी नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार जी. एस. लबडे तपास करीत आहेत.