अहमदनगर-आगामी रमजान ईद व अक्षय्य तृतीया सणांच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश, अफवा पसरविल्यास संदेश पाठविणारा तसेच ग्रुप अॅडमिन या दोघांवरही कारवाई होणार असून सीआरपीसी कलम 149 नुसार तशी नोटीस सायबर पोलिसांनी नगर जिल्ह्यातील सर्व ग्रुप अॅडमिन यांना काढली आहे.
याबाबत काढलेल्या नोटीसमध्ये सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी म्हटले आहे की, येत्या 22 एप्रिल रोजी रमजान ईद व अक्षय्य तृतीया हे सण साजरे होणार आहेत. हे सण शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याचे दृष्टीकोनातुन सोशल मीडिया जसे की व्हाटसअॅप, फेसबुक इंस्टाग्राम, ट्वीटर इत्यादी माध्यमातून आक्षेपार्ह मजकुर पोस्ट करणार्यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने लक्ष ठेवण्यात येत आहे.
समाजकंटकांकडून सोशल मिडियाचे माध्यमातुन चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात व त्यातुन दोन समाजात तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार असून अफवा पसरविणार्या विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
खोटे संदेश ग्रुपवर पाठविल्यास जिल्ह्यात सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेत बाधा निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपणांस व संबंधित व्यक्तीस (मेसेज प्रसारित करणारा) जबाबदार धरण्यात येवुन संबधिताविरूध्द प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ग्रुप अॅडमिनला पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे..