नगर जिल्ह्यात शेतकर्‍याचे अपहरण,50 लाखांच्या खंडणीची मागणी करणारे दोघे गजाआड

0
20

जमिनीच्या खरेदीसाठी शेतकर्‍याचे अपहरण करून 50 लाखांच्या खंडणीची मागणी करणारे दोघे एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ गजाआड करत अपहृत शेतकर्‍याची सुखरूप सुटका केली आहे.सखाराम नानासाहेब बर्डे (वय 35 रा. वांबोरी ता. राहुरी) व पंकज नानासाहेब पाटील उर्फ बेडगे (रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार सुनील अण्णासाहेब ढोकणे (रा. उंबरे ता. राहुरी) हा पसार झाला आहे. उमा रवी फुलपगार (वय 42 रा. सावेडी) यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या खरेदीकरिता आणखी 50 लाख रुपये द्यावे लागतील तरच आम्ही जमिनीच्या खरेदीचा व्यवहार करून देऊ, असे म्हणून सोमवारी फिर्यादीचे दीर मधुकर शांताराम फुलपगार यांचे तिघांनी विळद येथून अपहरण केले होते.

ही घटना सकाळी साडे अकरा ते सायंकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान घडली होती. यासंदर्भात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी एक पथक नियुक्त करून त्यांचा शोध सुरू केला. अपहरण केलेल्या मधुकर फुलपगार यांना तिघे जण कारमधून दूध डेअरी चौकातून शेंडी बायपास मार्गे पिंपळगाव माळवीकडे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी पाठलाग करून दोघांना पकडले तर ढोकणे पसार झाला. अपहृत मधुकर यांची त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे.