नगर शहरातील गुन्हेगार बंधूंची टोळी दोन वर्षाकरीता जिल्ह्यातून हद्दपार

0
25
Crowd walking down on sidewalk, concept of pedestrians, crime, society, city life

अहमदनगर -घातक हत्याराने गंभीर दुखापत करणारी नगर शहरातील गुन्हेगारी गिते बंधूंची टोळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दोन वर्षाकरीता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. टोळी प्रमुख सोमनाथ भानुदास गिते (वय 26) व टोळी सदस्य अशोक भानुदास गिते (वय 22, दोघे रा. भगवान बाबा चौक, निर्मलनगर, सावेडी) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे दाखल आहेत.

गिते बंधू यांनी टोळी तयार करून नगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी 2017 पासून सुरूवात केली. एकत्र येऊन दंगा करणे, मारामारी करणे, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणे, घरात घुसून मारहाण करणे, घातक हत्याराने मारहाण करणे असे गुन्हे त्यांनी करून परिसरात दहशत निर्माण केली होती. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून देखील सुधारणा होत नव्हती. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार नगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपारीची कारवाई करावी, तसा प्रस्ताव तोफखाना पोलिसांनी पोलीस अधीक्षक ओला यांच्याकडे दिला होता. त्यांनी सखोल चौकशी करून गिते बंधूंविरोधात हद्दपारीची कारवाई केली आहे.