महापालिकेत १३४ पदांच्या भरतीसाठी शासनाने मान्यता दिली असून टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.कंपनीसोबत मनपाची करार प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आस्थापना विभागप्रमुख अशोक साबळे यांनी सांगितले. मनपात तब्बल १८ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे.आस्थापना खर्च वाढल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मनपात नवीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. गेल्या सहा ते सात वर्षात अनेक अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे सर्वच विभागांत मनुष्यबळाची कमतरता आहे.
एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार विभागांचा पदभार आहे. त्यामुळे अनेक कामे रखडून नागरिकांचीही गैरसोय होते. मनपात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शासनाकडे किमान आवश्यक ती पदे भरती करण्यास मंजुरी द्यावी, यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्यानंतर आता टीसीएस या कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.