कोयता गँगची नगर शहरात दहशत, चौघांनी व्यावसायिकासह दोघांना मारहाण

0
24

अहमदनगर-व्यावसायिकासह त्यांच्या मित्राला मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवून लुटले. शनिवारी (दि. 19) रात्री 11:15 वाजता बुरूडगाव रस्त्यावर साईनगर कमानीजवळ ही घटना घडली. 11 हजार रुपयांची रक्कम लुटली असून याप्रकरणी रविवारी (दि. 20) कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मच्छिंद्र गोंविद दिंडे (वय 40 रा. भोसले लॉन शेजारी, बुरूडगाव रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. दिंडे यांचा लाईट डेकोरेशचा व्यवसाय आहे. ते शनिवारी दुपारी कामगार निखील सुरेश नरवडे (रा. कोठी) व मित्र कुणाल संतोष फुलसौंदर (रा. सारसनगर) यांच्यासह टेम्पोतून राहुरी येथे लाईट डेकोरेशन कामासाठी गेले होते. तेथील काम झाल्यानंतर कामाचे 11 हजार रुपये घेऊन ते टेम्पोमधून घरी जात असताना त्यांना साईनगर कमानीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 11:15 वाजता अडविले. त्याचवेळी आणखी एका दुचाकीवरून दोघे तेथे आले.

चौघांनी दिंडे यांच्यासह कामगार नरवडे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून दिंडे यांच्या खिशातील 11 हजार रुपयांची रक्कम काढून घेत तेथून निघून गेले. जखमी दिंडे व नरवडे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेतले व त्यानंतर रविवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक मोरे अधिक तपास करीत आहे