गॅसच्या वाढत्या दरांपासून वर्षभरात दिलासा मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, श्रीगोंदे व शिर्डी येथील ५५ हजार ग्राहकांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नगरकरांना डिसेंबरपासून, संभाजीनगरला ऑगस्ट २०२४ पासून थेट पाइपलाइनद्वारे गॅस मिळणार आहे. पाइपलाइनद्वारे मिळणाऱ्या गॅसमधून या दोन जिल्ह्यांतील ५५ हजार ग्राहकांचे दरमहा २ कोटी ७५ लाख रुपये वाचणार आहेत.
विशाखापट्टणम – मुंबई या मुख्य २४ इंची गॅस पाइपलाइनला ( श्रीगोंदे, अहमदनगर) येथे जोड देण्यात आला असून श्रीगोंदे ते अहमदनगर, अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर ते शिर्डी या गॅस पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत या दोन जिल्ह्यांत ५५ हजार ग्राहकांच्या घरात गॅस मीटर बसवण्यात आले आहेत. नगर शहरातील २० हजार ग्राहकांना डिसेंबर महिन्यापासून तर छत्रपती संभाजीनगरच्या २८ हजार ग्राहकांना ऑगस्ट २०२४ पासून थेट पाइपलाइनद्वारे गॅस दिला जाणार आहे.
श्रीगोंदे येथून गॅसची पाइपलाइन नगर शहरात आली असून श्रीगोंद्यातील २० ग्राहकांना प्रत्यक्षात पाइपलाइनद्वारे गॅस वितरित केला जात आहे. नगरपासून २५ किलोमीटरवरील कोळगाव येथे प्रत्यक्षात पाइपलाइनद्वारे गॅस आला आहे. नगर शहराजवळील अरणगाव येथून केडगाव बाह्य वळण रस्त्यामार्गे शेंडी येथून छत्रपती संभाजीनगरकडे ही गॅस पाइपलाइन गेली असून केडगावमार्गेच ही पाइपलाइन राहुरी, शिर्डीकडे गेली आहे. या पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत ७ लाख ८५ हजार गॅस मीटर बसवण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात या दोन जिल्ह्यातील श्रीगोंदे शहर २ हजार, अहमदनगर शहर २० हजार, छत्रपती संभाजीनगर २८ हजार व शिर्डी ५ हजार अशा एकूण ५५ हजार उर्वरित ग्राहकांच्या घरात मीटर बसवण्यासाठी पहिल्या टप्प्यात कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसले तरी ग्राहकांच्या किचनमध्ये प्रत्यक्षात गॅस देण्यापूर्वी ग्राहकांना मात्र बीपीसीएलला ६ हजार ५५० रुपयांचा डीडी किंवा चेक द्यावा लागणार आहे. त्यानंतरच घराच्या बाहेर लावण्यात आलेल्या मीटरमधून गॅसचे कनेक्शन सुरू होणार आहे.