नगर जिल्ह्यात सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकाऱ्याची हत्या एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

0
884

दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणुन डोक्यात लाकूड व कुर्‍हाड सदृश्य धारदार हत्याराने वार करुन सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शिवनाथ नारायण साबळे (वय 60) यांची हत्या करण्यात आली. ही घटना शेवगाव तालुक्यातील भगूर येथे बुधवार दि. 4 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शिवनाथ नारायण साबळे (वय 60) हे शेवगाव पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते दीड वर्षापूर्वी सेवानिवृत्त होवून आपल्या मूळगावी भगुर (ता. शेवगाव) येथे गावामध्ये राहात होते.मयत साबळे यांच्या शेताशेजारीच शेती असलेल्या एकाने बुधवार दि. 4 रोजी ते शेतामध्ये कामानिमीत्त गेले होते. तेथे एकाजणाने मयत साबळे यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र मयत साबळे यांनी पैसे न दिल्याने आरोपीने साबळे यांच्या डोक्यामध्ये लाकुड व कुर्‍हाड सदृश्य धारदार हत्याराने वार करुन जबर मारहाण केली.

या मारहाणीमध्ये शिवनाथ साबळे हे जबर जखमी झाले. त्यांना शेजारील नातेवाईत व कुटूबियांनी शेवगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेवून मारहाण करणार्‍या एकाला ताब्यात घेतले आहे. मयत साबळे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. या प्रकऱणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.