अहमदनगर : जामखेड येथील भांड्याचे व्यापारी महेंद्र बोरा आपल्या कुटुंबीयांसह राजस्थानात देवदर्शनासाठी गेले होते. तेथून ते विमानाने पुण्यात सुखरूप परतले. त्यानंतर बोरा यांनी जामखेडपर्यंतचा प्रवास कारमधून सुरू केला. घर काही किलोमीटर अंतरावर असतानाच एका अवघड वळणावरील पुलावर त्यांची कार उलटली आणि पुलावरून खाली कोसळली. यामध्ये व्यापारी महेंद्र बोरा यांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील तिघे जखमी झाले आहेत.
भांड्याचे व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा (वय ५८) काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत राजस्थानात देवदर्शनाला गेले होते. काल रात्री ते विमानाने पुणे विमानतळावर पोहोचले. तेथून सर्वजण त्यांच्या वाहनातून जामखेडकडे निघाले. सकाळी त्यांची कार नगर-जामखेड रोडवरील पोखरी फाट्याजवळ आली. तेथील पुलावर कार पलटी होऊन कोसळली. यामध्ये महेंद्र बोरा यांचे निधन झाले असून त्यांची पत्नी रेखा महेंद्र बोरा (वय ५२), सून जागृती भूषण बोरा (वय २८) व नात लियाशा भूषण बोरा (वय ६) हे गंभीर जखमी झाले आहेत.






