Ahilyanagar crime news: उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय ,दोन पीडित महिलांची सुटका

0
36

श्रीरामपूर -शहरातील उच्चभ्रू वस्तीत एका महिलेकडून तिच्या राहत्या घरामध्ये अवैध देह व्यापार चालवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, श्रीरामपूर शहर पोलिसांनी कारवाई करत दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, काल शनिवार दि. 28 डिसेंबर रोजी 55 वर्षीय महिला आरोपीच्या घरात बाहेरून मुली आणून अनैतिक व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता वेश्या व्यवसाय चालू असल्याचे दिसून आले.

छापा टाकल्यावर ही महिला व तिच्यासोबत दोन ग्राहक प्रतिक्षेत बसलेले आढळले. घरातील दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये दोन महिला ग्राहकांसोबत असल्याचे दिसून आले. चौकशीदरम्यान, पीडित महिलांनी सांगितले की, सदर महिलेने त्यांना मसाजसाठी बोलावून घेतले. आणि नंतर ग्राहकांसोबत व्यवहार करून त्यांना अनैतिक कामासाठी खोलीत पाठवले. या कामातून मिळणार्‍या पैशांत अर्धा वाटा देण्याचे आमिष त्यांना दाखवले. पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली असून सदर महिलेविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, उपनिरीक्षक समाधान सोळंके, रोहिदास ठोंबरे, हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार, कॉन्स्टेबल संभाजी खरात, अजित पटारे, अमोल गायकवाड, अमोल पडोळे, सचिन दुकळे, पोलीस नाईक सोनाली गलांडे, कॉन्स्टेबल अर्चना बर्डे, पुनम मुनतोडे यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करत आहेत.