अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या भंडारदरा धरण आणि कळसूबाई शिखर परिसरात काजवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. पावसाळ्यापूर्वी असंख्य काजवे परिसरात लुकलुक करतात. त्यामुळं महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटक भंडारदरा परिसरात येत असतात.काजवा महोत्सव पाहून घरी परतणाऱ्या पर्यटकांवर काळाने घाला घातला. अकोले तालुक्यातील नवलेवाडी शिवारात कोल्हार-घोटी राज्यमहामार्गावर पुणे येथील कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असून, यात एका महिलेचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत. रेखा लाहोटी असे मयत महिलेचे नाव आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून हा भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील काही पर्यटक हा मोहत्सव बघण्यासाठी आले होते. काजवा मोहत्सव पाहून घरी परतत असताना या पर्यटकांच्या कार क्रमांक एमएच १२ – एस यु – ८८८२ या गाडीला शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. कार अकोले तालुक्यातील नवलेवाडी शिवारात आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार एका वडाच्या झाडाला धडकली.
अपघाताच्या आवाजाने स्थानिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र गाडीतील एअर बॅग फुटून गेल्या होत्या. तसेच सर्व दरवाजे लॉक झाले होते. जखमींना गाडीबाहेर काढणे अवघड झाल्याने गाडीच्या दरवाजांमध्ये लोखंडी पहार घालून दरवाजे उघडण्यात आले. जखमींवर संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.