नगर येथे भरबाजारात दोन व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नगर शहरामध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. या हल्ल्यामध्ये दोन्ही व्यापारी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून फेरीवाले आणि दुकानदार यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. या वादातूनच हल्ला करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात संतापाची भावना असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
या बंदामध्ये कापड बाजार चौकामधील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती तसेच या ठिकाणी व्यापाऱ्यांनी एकत्रितपणे येऊन या घटनेचा निषेध करत जोपर्यंत रस्त्यातील हातगाडी व अतिक्रमण काढणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली. नगर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज व्यापाऱ्यांनी व विविध संघटनांनी बंदच्या हाकेला उत्तम प्रतिसाद दिला. सकाळपासूनच या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली होती.
आंदोलनाला आमदार संग्राम जगताप शिवसेनेचे युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, आमदार संग्राम जगताप शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसुंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर योगीराज गाडे, विपुल शेटीया, कुणाल भंडारी तसेच बहुसंख्य व्यापारी सह भाजपा व अन्य पक्षांचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.