प्रा. होले यांचे मारेकरी सापडेना! समता परिषद आक्रमक…

0
32

प्रा. शिवाजी किसन उर्फ देवा होले (रा. जाधव पेट्रोल पंपाजवळ कल्याण रोड, नगर) यांच्या डोक्यात पिस्तुलातून गोळ्या घालून खून केल्याची घटना 23 फेब्रुवारी रोजी घडली आहे. या खुनाला पाच दिवस उलटून गेले तरी अजूनही खुनी कोण? याचा शोध लागलेला नाही. पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागलेले नाहीत. दरम्यान मारेकर्‍यांचा शोध लागत नसल्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवदेन देण्यात आले असून मारेकर्‍यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रा. होले हे नगर शहरात राहत होते. ते श्रीरामपूर शहरातील बोरावके महाविद्यालयात इतिहास विषयाचे प्राध्यापक होते. 23 फेब्रुवारीला त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर ते नातेवाईक अरुण नाथा शिंदे (वय 45 रा. नेप्ती ता. नगर) यांच्यासोबत केडगाव बायपास येथील हॉटेल के 9 समोरील एका बंद ढाब्याजवळ दारू पित बसले होते. तेथे आलेल्या तिघांनी त्यांच्यावर हल्ला करून प्रा. होले यांना पिस्तुलातून गोळ्या घातल्या. यात प्रा. होले यांचा मृत्यू झाला. लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांनी प्रा. होले यांचा खून केल्याची फिर्याद नातेवाईक शिंदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे.

कोतवाली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. गेल्या गुरूवारपासून तपास सुरू असून पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागले नाहीत. लुटमारी करणार्‍या काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे पोलिसांनी चौकशी केली. तांत्रिक तपास सुरू आहे. नाजूक कारण, व्यवहारीक कारणासह प्रा. होले यांचे कोणासोबत असलेल्या वादातून हा प्रकार घडला का? अशा सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. शेवटी लुटीच्या उद्देशानेच हा प्रकार झाल्याचे अद्याप तरी पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे.

प्रा. होले यांचा खुनी शोधण्यात पोलिसांना यश येत नसल्याने नातेवाईकांसह मित्र परिवारांनी अधीक्षक ओला यांची भेट घेऊन लवकरात लवकर खुनी शोधण्याची मागणी केली आहे. दरम्यान लवकरच प्रा. होले यांचे मारेकरी सापडतील, असे आश्वासन अधीक्षक ओल यांनी नातेवाईकांना दिले आहे.