नगरमधील सराफाच्या दुकानातून दागिने चोरणारी महिला निघाली नगर तालुक्यातील सराईत गुन्हेगार

0
2088

अहमदनगर -नगर शहरातील सराफाच्या दुकानातून ५ ग्रॅम सोन्याचे डोरले चोरून पसार झालेल्या महिलेचा कोतवाली पोलिसांनी छडा लावला असून सदर महिला ही नगर तालुक्यातील जेऊर येथील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी जेऊर येथून तिला ताब्यात घेत तिच्याकडून चोरलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

संगीता बाबासाहेब भगत (रा. जेऊर, ता. नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिलेने शहरातील जुनी वसंत टॉकीज येथील चंदुकाका ज्वेलर्स या सराफी दुकानातून दि.२९ मार्च रोजी दागिने खरेदीचा बहाणा करत हातचलाखी करून ३३ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले चोरून नेले होते. आरोपी महिला दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली होती. तपासी अधिकारी पोलीस नाईक गणेश गाडगे यांचे पथक आरोपी महिलेचा शोध घेत असताना आरोपी जेऊर येथे राहत असल्याची माहिती मिळाली होती. मात्र आरोपी महिला घरी थांबत नव्हती. ती सकाळीच घरातून बाहेर पडत असल्याने ती पोलिसांना सापडत नव्हती. पोलिसांचे एक पथक शुक्रवारी (दि.२२) सकाळी जेऊर गावात दाखल झाले. पथकात दक्षता समितीच्या अॅड. नलिनी गायकवाड यांच्यासह महिला पोलीस नाईक वर्षा पंडित, छाया गायकवाड, पो.ना.सुमित गवळी, बंडू भागवत, सागर पालवे, रवि टकले यांचा समावेश होता. सदर आरोपी महिलेने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पथकाने तिच्या कडून चोरलेले सोन्याचे डोरले हस्तगत केले आहे.

पकडलेली महिला ही सराईत गुन्हेगार असून तिच्यावर या पूर्वी तोफखाना पोलिस ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत. महामार्गावर थांबून वाहनचालकाला लिफ्ट मागायची आणि नंतर त्याला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून त्याच्याकडून पैसे उकळायचे. असा तिने अनेकांना गंडा घातलेला आहे. मात्र बदनामीच्या भीतीने अनेकजण तक्रार करण्यास पुढे आलेले नाहीत. तर दोघांनी धाडस दाखवत गुन्हे दाखल केले आहेत.

सदर महिला जेऊर गावात खोली भाड्याने घेऊन राहत होती. पथक तिच्या घरी गेले असता तिच्या घरात महागड्या साड्या, दागिन्यांचे मोकळे खोके, कोट, महागडे गॉगल्स आदी वस्तू आढळून आल्या. याबाबत आरोपीकडे विचारणा केली असता तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. आरोपी महिलेल्या घरातील महागड्या वस्तू पाहून पथकही अवाक् झाले.