अहमदनगर- तक्रार देण्यासाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आलेल्या दोन महिला एकमेकांशी भिडल्या. शनिवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघींना ताब्यात घेत त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस अंमलदार कोमल जाधव यांनी फिर्याद दिली आहे. श्रध्दा उत्तम जाधव (वय 24, रा. काटवन खंडोबा रोड, नगर) व आल्मास रिझवान शेख (रा. सदर बाजार, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. त्या दोघी शनिवारी (दि.6) दुपारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आल्या होत्या. पोलीस ठाण्याच्या आवारात त्यांचे एकमेकांशी वाद झाले. श्रध्दा जाधव हिने पोलीस ठाण्याच्या आवारात मोठमोठ्याने आरडाओरडा करून, ‘मी आत्महत्या करीन’, अशी धमकी देऊन शिवीगाळ केले. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ दोघींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द भादंवि कलम 160, 186, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार पी. ए. बारगजे करीत आहेत.






