नगरमध्ये दोन गटांत हाणामारी पोलिसांकडून धरपकड, तोडफोड व जाळपोळ करणारे अटकेत

0
26

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वारूळवाडी (ता. नगर) शिवारात गजराजनगर येथे दोन समाजाच्या गटात मंगळवारी रात्री मोठा वाद झाला होता. या वादाचे रूपांतर मारहाण, तोडफोड व जाळपोळीमध्ये झाले होते. त्यानंतर इंद्रायणी हॉटेलजवळ हाणामारी, तर मुकुंदनगरजवळ महामार्गावर तुफान दगडफेक होऊन अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गटाचे मिळून एकूण 19 जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही गटांचे पाच जण जखमी झाले आहेत.

स्टेटस ठेवण्याच्या कारणातून हा वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असले तरी यामागील मुळ कारण पोलिसांनी शोधले असून त्यादृष्टीने तपास करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे, एलसीबीचे निरीक्षक दिनेश आहेर, तोफखान्याचे निरीक्षक मधुकर साळवे, एमआयडीसीचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप, भिंगार कॅम्पचे निरीक्षक दिनकर मुंडे यांनी स्वतः पथकासह घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते. बुधवारी शहर, उपनगरात तणावपूर्ण शांतता होती.