युवकाबरोबर तात्पुरती लग्न घटिका नवरी पैसे घेऊन भुर्रर… नगर जिल्ह्यातील प्रकार

0
24

कोल्हार येथील युवकाबरोबर त्याच्या पत्नीने लग्न करून संसार थाटण्याचे नाटक केले. लग्नानंतर अगदी थोडे दिवस नववधू नांदली. मात्र अल्पावधीतच फसवणूक करीत २ लाख रुपयांचा गंडा घातला.

लग्नानंतर नववधूला सासरी न पाठविता उलट नवऱ्याला व त्याच्या कुटूंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. लग्नाच्या बहाण्याने आपणास गंडविले गेल्याचे युवकाच्या लक्षात आल्यानंतर पोलिस दफ्तरी गुन्हा नोंदविण्यात आला.फसवणूक झालेल्या कोल्हार येथील रवींद्र बाळासाहेब खर्डे ( वय २७ ) या युवकाने याबाबत लोणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुनीता धरम गावराणे, तिचा मुलगा गणेश धरम गावराणे, तिचा नवरा धरम गावराणे सर्व राहणार जेल रोड, नाशिक, भाग्यलक्ष्मी नगर, लग्नाची मुलगी ( वधू ) सविता सुरेश साठे, तिची बहीण कविता सुरेश साठे, सविताची मावशी सोनाली राम सुजन रॉय, सविताचे वडील सुरेश दामोदर साठे, आई संगीता सुरेश साठे सर्व राहणार अंबड जि. नाशिक या आठ जणांवर लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना २७ एप्रिल रोजी घडली.
कोल्हार येथील रवींद्र खर्डे या युवकाचे नाशिक येथील सविता सुरेश साठे या मुलीशी लग्न झाले. सदर विवाह कोर्ट मॅरेज पद्धतीने झाला. मुलाकडून १ लाख ७५ हजार रुपये मुलीच्या घरच्यांनी घेतले. लग्न झाल्यानंतर मुलगी माहेरी गेली.

मुलीने जाताना घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम १७ हजार रुपये नेले. मात्र सदर मुलीचा नवरा व कुटुंबातील व्यक्ती तिला कोल्हार येथे सासरी घेऊन येण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलाकडील कुटुंबाला आपला विश्वासघात व फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

याबाबत लोणी पोलिस ठाण्यात वरील आठ जणांविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २३९/ २०२३ भादवी कलम ४२०, ४०६, १२० ब, ३७९, ५०४,५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणीचे सपोनी युवराज आठरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे करीत आहेत