अहमदनगर-खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस आश्रय देऊन पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केल्याबद्दल बाबासाहेब भाऊ मराठे (वय 36, रा. मराठवाडी, ता. आष्टी, जि. बीड) यास तीन वर्ष सक्तमजुरी आणि 10 हजार रूपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी ठोठावली. अॅड. अनिल ढगे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.
मच्छिंद्र महादेव अकोलकर याने त्याची पत्नी अश्विनी हिस कार (एमएच 20 बी वाय 77) मधून दिनांक 7 एप्रिल 2016 रोजी मढी, मायंबा येथे देवाच्या दर्शनासाठी जायचे असे म्हणून घेऊन गेला. सदर गाडीमध्ये चाकूने मारहाण करून तीस गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. बाबासाहेब मराठे याने आरोपीस सदरचे कृत्य करण्यास मदत केली.तसेच मयताचे प्रेत खर्डा गावचे अलीकडे जातेगाव घाटात नेऊन प्रेतावर पेट्रोल टाकून प्रेत जाळून टाकण्यास मदत केली. कार जेजुरी (जि. पुणे) येथील तळ्यात घेऊन गेला, रक्ताचे डाग धुऊन पुरावा नाहिसा केला. त्यानंतर पुन्हा फरार आरोपी मच्छिंद्र अकोलकर यास वाघोली येथे सोडले.
मराठे याला घटनेचा पाश्चाताप झाल्यावर त्याने स्वतः पाथर्डी पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची फिर्याद नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. शिंदे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने 14 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. मृत अश्विनी हिचे शवविच्छेदन करणारे डॉक्टर तसेच साक्षीदार व पंच यांच्या साक्षी अतिशय महत्वाच्या ठरल्या. तसेच पेट्रोल पंपावरील व टोल नाक्यावरील लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये घटनेच्या वेळेस आरोपीचा वावर तसेच आरोपीने मयतास जाळण्यासाठी घेतलेले पेट्रोल याबाबत फुटेजमध्ये दिसून आले आहे.
अॅड. मनिषा केळगंद्रे -शिंदे यांनी प्रारंभी काम पाहिले, त्यानंतर अॅड. ढगे यांनी उर्वरित कामकाज पूर्ण केले. मराठे याला पुरावा नष्ट करण्यास मदत करणे आणि गुन्हेगाराला आश्रय दिल्याबद्दल तीन वर्ष सक्तमजुरी आणि 10 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले