विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढत केला अत्याचार,नगर तालुक्यातील घटना..

0
1408

विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लॉजवर नेवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ तयार करुन तो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याची घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली असून याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल होताच नगर तालुका पोलिसांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. किशोर सीताराम तळेकर (रा.वाळुंज, ता.नगर) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने नगर तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेशी गोड बोलून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दि.२२ जुलै २०२२ रोजी दुपारी तिला फिरायला जाण्याच्या बहाण्याने नगर-दौंड रोडवरील अरणगाव परिसरात असलेल्या एका लॉजवर नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला व त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. त्यावेळी सदर महिलेने त्यास व्हिडिओ रेकॉर्डींग करू नको, अशी विनंती केली मात्र त्याने तिला दमबाजी करत व्हिडिओबाबत जर कोणास काही सांगितले तर तुला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली.

या घटनेनंतर भितीपोटी सदरील महिलेने ही बाब कोणालाही सांगितली नाही. त्यानंतर २-३ दिवसांपुर्वी सदर आरोपीने २२ जुलै रोजी लॉजमध्ये मोबाईलवर काढलेला अश्‍लिल व्हिडिओ त्या महिलेच्या गावातील काही जणांना पाठविला. तो व्हिडिओ नंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक जणांच्या मोबाईलवर व्हायरल झाला. सदरील महिलेच्या पतीच्या मित्राच्या निदर्शनास तो व्हिडीओ आल्यानंतर त्याने ही बाब महिलेच्या पतीला सांगितली. त्यामुळे त्या महिलेला व तिच्या कुटुंबियांना धक्का बसला. त्यांनी शुक्रवारी (दि.७) रात्री नगर तालुका पोलिस ठाण्यात येवून याबाबतची फिर्याद दिली.

या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी किशोर सीताराम तळेकर (रा.वाळुंज, ता.नगर) याच्याविरुद्ध भा.दं.वि.क. ३७६ (२), (एन), ५०६ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७, ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. राजेंद्र सानप यांनी व त्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. या गुन्ह्याच तपास पारनेरचे पो.नि. घन:श्याम बळप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.