अहमदनगर -शहर सहकारी बँक व संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण प्रकरणातील एका एजंटला पोलिसांनी रविवारी इंदौर (मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेतले होते. अनिकेत सुनील आर्य (रा. माळीवाडा, नगर) असे त्या एजंटचे नाव आहे. त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आर्य याला 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहर सहकारी बँक व संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गोल्ड व्हॅल्यूअर अजय कपाले याला मदत करणारा अनिकेत आर्य हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच नगरमधून पसार झाला होता. त्याने कपाले याला बनावट सोने तारण प्रकरणात मदत केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. तो इंदौर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर आर्थिक गुन्हे शाखा पोलीस व इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अनिकेत आर्या याला ताब्यात घेतले. त्याला गुन्ह्यात अटक केली असून त्याच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.






