अहमदनग=मुलीच्या नावे असलेल्या घराचे आई व इतर तिघांनी खोटी कागदपत्रे तयार करून घराची परस्पर विक्री केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अनुजा संजय बोरकर (काशिबाई शंकर कडेकर) रा. पौंड रस्ता, पुणे यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यामध्ये फिर्यादी यांची आई कमलाबाई शंकर कडेकर, भावजयी सुषमा शामराव कडेकर (दोघी रा. आलमगीर, भिंगार), कुणाल मंत्री (रा. दौंड, पुणे), प्रिन्स हाउसिंग सोसायटीचे विसर्जन अधिकारी मेहेर प्रकाश बापू देठे यांचा समावेश आहे. फिर्यादी यांचे लग्नापूर्वीचे नाव काशिबाई शंकर कडेकर होते. लग्नानंतर ते अनुजा संजय बोरकर असे झाले आहे. फिर्यादी यांनी 1991 साली सर्वे नं. 25 पिअन्स हाउसिंग को.ऑफ सोसायटी, पाईपलाईन रस्ता, भिस्तबाग चौक, सावेडी येथे रो.हाऊस क्र. 2 घेतले होते. त्यावर महाराष्ट्र स्टेट को. ऑफ हौसिंग फायनान्स कार्पोरेशन या संस्थेकडून 35 हजार रुपये कर्ज घेतले होते. 28 ऑक्टोबर, 1991 रोजी फिर्यादी यांना घराचा ताबा मिळाला होता. तेव्हापासून फिर्यादी यांच्या मालकीच्या घरामध्ये दोन भाडेकरू राहत होते.
दरम्यानच्या काळात प्रिन्स सह गृहनिर्माण संस्था, सावेडीचे जागा मालक अल्ताफ शेख हे मयत झाल्याने जागेचे खरेदीखत होऊ शकले नाही. परंतु, मनपाची कर पावती, ताबा पावती, कर्जप्रकरणावर घरमालक म्हणून फिर्यादी यांचेच नाव आहे. दरम्यान फिर्यादी यांनी सदर घर विक्री करण्यासाठी काढले असता त्यांना समजले की, सह. दुय्यम निबंधक वर्ग 1 अहमदनगर यांच्याकडील दस्त क्र 2321/2022 दि. 30 मार्च, 2022 रोजी काशिबाई शंकर कडेकर यांच्या नावे प्रिन्स हाउसिंग को.ऑफ सोसायटी, पाईपलाइन रस्ता, भिस्तबाग चौक, सावेडी येथे रो.हाऊस क्र. 2 हे घर फिर्यादी यांची आई कमलाबाई शंकर कडेकर यांनी परस्पर लक्ष्मण विठ्ठल गुंड (रा. शेवगाव) यांना विकले आहे.
फिर्यादी यांची आई कमलाबाई, भावजयी सुषमा कडेकर यांनी सदर घरामध्ये राहणार्या भाडेकरूंना घर खाली करण्यासाठी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांना समजले की, आईचा नातजावई कुणाल मंत्री व महाराष्ट्र स्टेट को ऑफ हाउसिंग फायनान्स कार्पोरेशनचे मॅनेजर व प्रिंन्स हाउसिंग सोसायटीचे विसर्जन अधिकारी मेहेर प्रकाश बापु देठे यांचेसह घराची खोटी कागदपत्रे बनवून घराची परस्पर विक्री केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.






