वकिलाविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा माननीय उच्च न्यायालया मध्ये रद्द
फिर्यादी यांनी त्यांचे वडील सावत्र भाऊ व त्यांचे नातेवाईक व अर्जदार वकील यांच्याविरुद्ध 60 लाख रुपये ची खंडणी मागितल्या बद्दल राहता पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. तदनंतर अर्जदार यांनी गुन्हा रद्द करण्याकरता ॲड. संदीप रामनाथ आंधळे यांच्यातर्फे प्रकरण दाखल केले होते, त्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाचे न्यायमूर्ती श्री मंगेश एस. पाटील आणि माननीय न्यायमूर्ती अभय एस. वाघवासे साहेबांनी अर्जदारांनी दाखल केलेले प्रकरण मंजूर करून अर्जदार वकील यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात आला.
प्रस्तुतच्या प्रकरणाची हकीगत अशी की, मौजे दाढ तालुका राहता येथील फिर्यादी यांनी त्यांचे वडील व सावत्र भाऊ यांच्या विरुद्ध तसेच सावत्र बहिणीचा नवरा व अर्जदार/ वकील यांच्याविरुद्ध राहता पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली की, आरोपी व फिर्यादी यांची मौजे वांजोळी तालुका नेवासा येथे वडिलोपार्जित शेत जमीन आहे व सदरची शेतजमीन ही त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे, सदरील शेत जमिनीतून त्यांनी मौजे नेवासा बुद्रुक सुरेगाव रोड येथे जमीन घेतलेले आहे, व सदरच्या शेत जमिनीचा वाद दिवानी न्यायालयामध्ये सुरू आहे त्यामुळे इतर सर्व आरोपी व अर्जदार हे फोनवर धमकी देऊन साठ लाख रुपये ची मागणी करत होते, याखेरीस दिनांक 12 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी जेव्हा नेवासा वरून त्यांच्या गावी येत असताना आरोपीचे सावत्र भाऊ व आरोपीचे वडील यांनी फिर्यादीला रस्त्यावर आडून मारहाण केली त्यातून ते जखमी झाले तसेच त्यांनी 60 लाख रुपये ची खंडणी मागितली म्हणून फिर्यादी यांनी राहता पोलीस स्टेशन येथे आरोपी व अर्जदार यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याचा आणि मारहाण केल्याबद्दल व धमकी दिल्या बाबतचा गुन्हा तक्रार दाखल केली.
सदरची तक्रार दाखल केल्यानंतर अर्जदार यांनी ॲड. संदीप आंधळे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे सदरचा गुन्हा रद्द करण्याकरता प्रकरण दाखल केले होते, सदरच्या प्रकरणाची प्राथमिक सुनावणीनंतर माननीय न्यायालयाने सरकारी पक्ष आणि फिर्यादी यांना नोटीसा बजावल्या होत्या, दरम्यानच्या काळात सदरच्या प्रकरणांमध्ये सर्व आरोपी अर्जदार विरुद्ध मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब, राहता येथे आरोपी विरुद्ध दोषारोप पत्रही दाखल करण्यात आले होते, त्यानंतर आरोपीतर्फे अर्जामध्ये दुरुस्ती करून सदरचे दोषारोप पत्र आणि फौजदारी कारवाई रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती, त्यानंतर सदरचे प्रकरण माननीय न्यायलया समोर अंतिम सुनावणीसाठी आले असता आरोपी अर्जदार यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला की, सदरच्या प्रकरणांमध्ये अर्जदार हे स्वतः वकील आहेत व इतर आरोपीनी फिर्यादी विरुद्ध दावा दाखल केला होता सदरचे प्रकरणांमध्ये ते वकील म्हणून आरोपीची बाजू मांडत आहेत व तसेच या अगोदरही अर्जदार यांनी फिर्यादी विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रारी अर्जही दाखल केलेले आहेत, त्यामुळे अर्जदार आरोपी यांचा सदरच्या प्रकरणांमध्ये किंवा खंडणी मागण्याच्या बद्दल कसलाही काडीमात्र संबंध नाही तसेच सदरचे प्रकरण फक्त आणि फक्त त्रास देण्याच्या हेतूने दाखल करण्यात आलेले आहे, तसेच सदरचे प्रकरणांमध्ये सरकारी पक्ष व फिर्यादी पक्ष यांनी अर्जास आक्षेप नोंदवला.
दोन्हीही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर सदरचे प्रकरण निकालाकरता राखून ठेवण्यात आले होते, सदरच्या प्रकरणांमध्ये दाखल करण्यात आलेले सर्व कागदपत्राची सहनिशा व पडताळणी केल्यानंतर तसेच माननीय न्यायमूर्ती साहेब यांनी अर्जदार यांच्यातर्फे मांडण्यात आलेले सर्व मुद्दे आणि दाखल करण्यात आलेले इतर निकालाचे दाखले व पुरावे पाहून माननीय न्यायमूर्ती साहेब यांनी अर्जदार यांनी दाखल केलेला अर्ज मंजूर केला व अर्जदाराविरुद्ध दाखल असलेला एफ. आय. आर./ तक्रार रद्द केली याबरोबरच त्यानंतर दाखल करण्यात आलेले दोषारोप पत्र आणि फौजदारी कारवाई सुद्धा रद्द करण्यात आली.
अर्जदार/ वकील यांच्यातर्फे ॲड. संदीप रामनाथ आंधळे यांनी बाजू मांडली.






