अल्पवयीन विवाहितेला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात विवाहितेचा पती, सासू-सासर्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. विवाहितेच्या पतीला 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून सासू-सासर्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
नगर तालुक्यातील एका गावात राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. नगर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या तरूणाचे फिर्यादीसोबत लग्न झाले होते. लग्नासाठी झालेल्या खर्चाची मागणी करत पती, सासू-सासर्याने फिर्यादीचा छळ केला. मारहाण, दमदाटी केली. फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्या पतीने शारिरीक संबंध ठेवून गर्भवती केले. तसेच गर्भधारणा झाल्यानंतर हे मुल माझे नाही म्हणून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून गर्भपाताच्या गोळ्या बळजबरीने खायला देवून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाठक, पोलीस अंमलदार विजय नवले यांच्या पथकाने तिघांना अटक केली.