भाजपाच्या निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर पोस्ट टाकताना दोन धर्मात तेढ निर्माण होईल असा मजकूर प्रसारित करणे नगर जिल्ह्यातील एका २२ वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपाच्या निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात देशभर आक्रोश व्यक्त केला जात आहे. त्यातच संगमनेर शहरातील कुंभार गल्लीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने त्याच्या व्हाटसअप स्टेटस वर नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ शनिवारी (दि.११) दुपारी पोस्ट टाकली होती. या पोस्ट मध्ये दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकला होता. हे व्हाटसअप स्टेटस पाहून संगमनेर मध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशी माहिती काहींनी पोलिसांना कळविली. त्यानंतर रात्री उशिरा मुस्लीम धर्मगुरू सय्यद अब्दुल रकीब अब्दुल पिरजादे (रा.मोमीनपुरा, संगमनेर) यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात सदर युवकाविरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी २२ वर्षीय तरुणावर भा.दं.वि.कलम ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला.त्यानंतर रविवारी (दि.१२) पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला सीआरपीसी १५१(१) प्रमाणे अटक केली आहे






