राहाता -ओळखीच्या दोघांकडे असलेले २४ लाख रुपये परत न दिल्याने नैराश्यातून व्यावसायिक महेंद्र लोढा (वय ४६) यांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना राहाता तालुक्यातील साकुरी येथे मंगळवारी(डी.३) पहाटे घडली. या घटनेने व्यवसायिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
राहाता पोलीस ठाण्यात मयत लोढा यांचा मुलगा सिद्धार्थ लोढा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे वडील महेंद्र लोढा यांना विलास कोंडीराम सोनवणे यांच्या कडून १८ लाख व रमेश आनंदा काळोखे ८ लाख (दोघे राहणार राहाता) यांच्याकडून घेणे बाकी होते. या पैशांची माझे वडील मयत महेंद्र लोढा यांनी सदर दोन व्यक्तींकडे वेळोवेळी मागणी केली असताना काळोखे व सोनवणे या दोन व्यक्तींसह त्यांच्या काही मित्रांनी माझ्या वडिलांना धमकावून आम्ही पैसे देणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, असे बोलून वडिलांशी वाद घालत घातले व त्यांना विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.






