नगरमधील उड्डाणपुलावरून शेवगाव तालुक्यातील युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

0
38

अहमदनगर – अहमदनगर शहरातील स्टेशन रस्त्यावर झालेल्या उड्डाणपुलावरून खाली पडून एक 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.18) सकाळी 11.30 च्या सुमारास स्टेट बँक चौक ते चांदणी चौकादरम्यान असलेल्या वळणावर घडली. संकेत राजेंद्र डोळे (वय 21 रा.शहर टाकळी, ता. शेवगाव) असे या मयत तरुणाचे नाव आहे. मयत संकेत डोळे हा नगर तालुक्यातील वाळकी येथील धर्मनाथ शैक्षणिक प्रतिष्ठानच्या एन.डी.कासार फार्मसी कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.
तो मंगळवारी (दि.18) सकाळी 11.30 च्या सुमारास यामाहा कंपनीच्या एफझेड मोटारसायकलवर नगरमार्गे वाळकीकडे जात असताना उड्डाणपुलावरील स्टेट बँक चौक ते चॉंदणी चौकादरम्यान असलेल्या वळणावर आला असता त्याचा तोल गेल्याने तो उड्डाणपुलावरून खाली पडला. त्याची दुचाकी मात्र उड्डाणपुलावरच राहिली. उड्डाणपुलावरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपस्थित नागरिकांनी उपचारासाठी त्वरीत जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या तरुणाच्या दुचाकीचा वेग ताशी 80 असावा, तसेच त्याला वळणाचा अंदाज न आल्याने मोटारसायकल कठड्याला धडकून तो मोटारसायकलचा वेग जास्त असल्याने उडून उड्डाणपुलावरून खाली पडला असावा असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच नातेवाईकांना संपर्क साधून माहिती दिली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.