अहमदनगर ग्रामसभेत पाण्याचा प्रश्न उपस्थित करणाऱ्यावर प्राणघातक हल्ला

0
30

नगर – गावातील पुढार्‍यांनी राजकीय आकसापोटी पिण्याच्या पाणी पुरवठा बंद केला होता, तो पुर्ववत करावा ही मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल इघे यांनी ग्रामसभेत मांडली. म्हणून गावगुंडांकडून रस्त्यात अडवून अमानुष मारहाण केली असून इघे यांची प्रकृती चिंताजनक असून, खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. भ्याड हल्ला करुन फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधिक्षक यांना महाराष्ट्र प्रदेश बारा बलुतेदार महासंघाच्यावतीने देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष सागर आगळे, युवक दक्षिण जिल्हाध्यक्ष नितीन पवार, उपाध्यक्ष अनिल इवळे, हर्षल आगळे, डॉ.अमर इघे, विलास इघे, श्रीमती जे.जी.हराळे, दत्तात्रय पोपळघट, अनिल हिवाळे, संतोष पवार, विलास थोरात, किशोर सोनवणे, संदिप पवार, विनायक गाडेकर, रविंद्र विघवे, विजय हरिहर, नामदेव गाडेकर, तसेच जिल्ह्यातील लोहार युथ फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील साकुर येथील ग्रामसभेत सुनिल इघे यांनी ग्रामस्थांच्या पाणी प्रश्नाबाबत मागणी केली, त्याचा राग धरुन गावगुंडांनी मारहाण केली. जर पुन्हा ग्रामसभेत येऊन प्रश्न विचारले तर गावात राहू देणार नाही व गावातून बहिष्कृत करु, अशी धमकी दिली. इघे यांच्याबरोबर असणारे बिलाल शेख, प्रभाकर कदम यांना देखील या गावगुंडांनी मारहाण केली, त्यामुळे गावातील अल्पसंख्याक समाज, लोहार समाज भयभित झाला आहे, या कुटूंबाला पोलिस संरक्षण द्यावे, आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी आहे.

जर अटक करुन आरोपींवर कारवाई झाली नाही तर लोकशाही पद्धतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.