अहमदनगर : थेट पक्षीय संबंध नसला तरी सध्या सुरू असलेल्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. वरिष्ठ पातळीवर राजकीय अस्थिरता आणि अनिश्चितता असताना स्थानिक पातळीवरही पदाधिकारी, कार्यकर्ते स्वत:चे वेगळे निर्णय घेत आहेत. कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर तसेच शिवसेना ठाकरे गटाचे बळीराम यादव यांना भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये प्रवेश केला आहे. तालुकाध्यक्षच भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी तापकीर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.