नगर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या सर्व शाखा अभियंत्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून आश्वासित योजनेचा लाभ मिळवून देत दिवाळीची मोठी भेट दिली आहे. येरेकर यांनी विशेष प्राधान्य यादीत हा विषय घेवून अवघ्या दहा दिवसांत 137 शाखा अभियंत्यांचे आश्वासित योजनेचे आदेश पारित केले आहेत. महाराष्ट्रात अतिशय वेगाने शाखा अभियंत्यांना लाभ मिळवून देण्याची कामगिरी आशिष येरेकर यांनी नगर जिल्हा परिषदेत केली आहे.
जिल्हा परिषदेच्या अभियंता संघटनेची नियुक्तीच्या दिनांकापासून आश्वासित योजनेचा लाभ मिळावा ही मागणी बराच काळ प्रलंबित होती. याबाबत राज्यस्तरीय संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निकालानुसार जिल्हा परिषदेतील 137 कनिष्ठ अभियंता यांना नियुक्तीच्या दिनांकापासून आश्वासित योजनेचा लाभ मिळाला आहे. यामुळे संबंधित अभियंत्यांना पाच वर्षे वेतनवाढीचा फायदा होणार आहे.
सदरचा निर्णय अंमलात आणल्याबद्दल जिल्हा परिषद, अहमदनगर अभियंता संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आंधळे, कार्यकारी अभियंता परदेशी यांचे आभार मानले आहेत.






