जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले आदेश

0
39

अहमदनग -पुणतांबा-रास्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आजीनाथ रामभाऊ कडलग यांना त्यांच्या पदावरून तात्पुरते दूर करण्यात आले असून तसा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांनी नुकताच बजावला आहे.

राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथे ते कार्यरत असताना कामकाजात हलगर्जीपणा, वरिष्ठांच्या आदेशांचा अवमान करणे, पंचायत समिती स्तरावरील सभेस गैरहजर राहणे, ग्रामपंचायतीचे अभिलेखे योग्य रितीने व अद्ययावत न ठेवणे, गामपंचायत रोकड नोंदवही प्रमाणे हातावरील रकमेत अनियमिता आढळणे, कोणत्याही सूचनांचे पालन न करणे असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा नियम 1967 चा नियम 3 तसेच जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपिल) 1964 नियम मधील नियम 3 (1) (अ) नुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पदावरून दूर केलेल्या कालावधीत त्यांचे मुख्यालय पंचायत समिती कार्यालय कर्जत येथे असणार असल्याचे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

श्री. कडलग हे पुणतांबा येथे असताना त्यांच्या कामकाजाबाबत ग्रामस्थ खूपच नाराज होते. तसेच तीनच दिवसापूर्वी त्यांनी एका ग्रामस्थावर राहाता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. संबंधितावर अदखलपात्र गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष होता. काही ग्रामस्थांनी ना. विखे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली होती.