अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकाला तीन वर्षे कारावास व दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (पोक्सो कोर्ट) पी.आर.देशमुख यांनी ठोठावली आहे. सचिन नामदेव जाधव (वय 22 रा. नांदूर विहीरे पो. निंबे नांदूर ता. शेवगाव) असे शिक्षा झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर खटल्याचे कामकाज अति. सरकारी अभियोक्ता श्रीमती के. व्ही. राठोड यांनी पाहिले.
24 फेब्रुवारी 2022 रोजी 11.15 वाजेच्या सुमारास सचिन नामदेव जाधव याने फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी ही कॉलेजमधून घरी जात असताना तिचा पाठलाग करून, त्याने त्याची सायकल तिला आडवी लावून तिचा विनयभंग केला होता. घरी काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पीडित मुलीने सदरची घटना तिच्या आई- वडिलांना सांगितली. त्यांनी सचिन जाधव याला समजावून सांगितले, परंतु त्याने पुन्हा पीडितेची छेड काढली.
त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी सचिन जाधव याच्या विरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी घटनेचा तपास पूर्ण करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. युक्तीवाद व खटल्यात झालेला पुरावा ग्राह्य धरून आरोपीस न्यायालयाने शिक्षा ठोठावली. सदर खटल्यात पैरवी अधिकारी आर. व्ही. बोर्डे व पो.कॉ. संतोष राठोड यांनी सहकार्य केले.






