खा.डॉ.विखे म्हणाले, लोकसभेला मी उमेदवार असो वा नसो…कुणीही उभे राहू द्या पण…

0
18

आपण चार वर्षांच्या खासदारकीमध्ये मिरजगाव ते नगर हे अंतर अडीच तासांवरून चाळीस मिनिटांत आणले. मी काम करत राहतो. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मी उमेदवार असो अथवा नसो कोणीही उभे राहू द्या, तुम्ही फक्त चारित्र्यवान माणसालाच निवडून द्या असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण मतदारसंघात प्रत्येक घरामध्ये गोड पदार्थ करून आनंदोत्सव साजरा व्हावा, या हेतूने खा.सुजय विखे यांच्या संकल्पनेतून कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे साखर व डाळ वाटप करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ.रमेश झरकर, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कृ.ऊ.बा. समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, दादा सोनमाळी, माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, सरपंच नितीन खेतमाळस, भाजपाचे नेते संपत बावडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

विखे म्हणाले, स्व.बाळासाहेब विखे यांनी मिरजगाव येथे जी जमीन घेतली होती त्या जागेवर आम्ही मागील महिन्यात महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने मिरजगाव येथे पशुसंवर्धन विज्ञान केंद्र या प्रकल्पाकरिता केंद्र सरकारला प्रस्ताव दिला आहे. याबाबत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चाही केली असल्याने लवकरच केंद्राच्या माध्यमातून ५० एकरामध्ये ५० कोटी रूपयांचे पशुसंवर्धन विज्ञान केंद्र उभारण्याचा प्रयत्न करतोय. यामुळे हा प्रकल्प मिरजगावच्या विकासामध्ये आणखीन भर पाडण्याचे काम करेल. येथील जनतेने विखे पाटील परिवारावर सदैव प्रेम दाखवले असल्याचे त्यांनी सांगितले.