नगर- रेल्वे प्रशासनाने नगर तालुक्यातील सारोळा कासार परिसरात असलेले रेल्वेचे गेट बंद करुन वाहतुकीसाठी तयार केलेला भुयारी मार्ग पाण्यात गेल्याने परिसरातील 8-10 गावांतील नागरिकांचे गेल्या 4-5 दिवसांपासून प्रचंड हाल झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी शनिवारी (दि.24) सकाळी पुलाखालील पाण्यात उतरुन रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा निषेध व्यक्त केला.
सारोळा कासार गावाजवळ रेेल्वे मार्गावर असलेले 24 नंबरचे गेट गेल्या 4-5 वर्षांपूर्वी बंद करुन त्या गेटजवळच परिसरातील गावांच्या वाहतुकीसाठी भुयारी मार्ग तयार केलेला आहे. मात्र तो तयार करताना पावसाचे पाणी साचल्यास त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी नियोजन केलेले नव्हते. त्यामुळे गेल्या 5 दिवसांपुर्वी सारोळा कासार परिसरात मुसळधार पाऊस होऊन या भुयारी मार्गावर अडीच ते तीन फुट पाणी साचले. गेल्या 5 दिवसांपासून त्या पाण्याचा निचरा न झाल्याने परिसरातील 8-10 गावांमधील नागरिकांचे, शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. अनेकांच्या वाहनांमध्ये पाणी गेल्याने वाहने बंद पडून नुकसान झाले. रेल्वे प्रशासनाकडे गेल्या 4-5 दिवसांपासून पाठपुरावा करुनही प्रशासनाने चालढकल केली त्यामुळे सारोळा कासारसह घोसपुरी, अस्तगाव, घोडकेवाडी व परिसरातील गावांमधील संतप्त नागरिकांनी शनिवारी (दि.24) सकाळी त्या साचलेल्या पाण्यात उतरुन रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन केले. या आंदोलनात सारोळा कासार सेवा सोसायटीचे माजी चेअरमन संजय काळे, ग्रामपंचायत सदस्य गजानन पुंड, सुनील धामणे, अनिरुद्ध धामणे, संजय पाटील, दादासाहेब कडूस, रामभाऊ काळे, राजेंद्र कडूस, जगन्नाथ ढोरजकर, बंडू काळे, निलेश कडूस, बाळासाहेब कडूस, संजय धामणे, यांच्यासह परिसरातील गावांमधील नागरिक सहभागी झाले होते.
या आंदोलनाची दखल घेत रेल्वेच्या बांधकाम विभागाचे अभियंता अजयकुमार चौबे यांच्यासह पथकाने त्या ठिकाणी येवून पाहणी केली व दुपारी पाणी वाहून जाण्यासाठीच्या उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे परिसरातील 8-10 गावांना होणारा त्रास कमी होणार आहे. या ठिकाणी कायमस्वरुपीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उपसरपंच जयप्रकाश पाटील, संजय काळे यांच्यासह नागरिकांनी अभियंता अजयकुमार चौबे यांच्याकडे केली.
Home नगर जिल्हा रेल्वेचा भुयारी मार्ग पाण्यात गेल्याने वाहतुकीचा खोळंबा,नगर तालुक्यातील नागरिकांनी केला निषेध






