12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एड्स जनजागृती रॅलीचे ढवळपुरी येथे आयोजन करण्यात आले होते.
युवा दिनाच्या निमित्ताने युवा वर्गामध्ये एचआयव्ही एड्स बाबतची माहिती जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय अहमदनगर , ग्रामीण रुग्णालय पारनेर ,धन्वंतरी कला महाविद्यालय, ढवळपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीचे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमात जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी एचआयव्ही व तरुणांची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले, युवावर्गांनी एचआयव्ही एड्स बद्दलचे ज्ञान अवगत केल्यास व त्याबाबत समाजामध्ये सकारात्मक संदेश दिल्यास एच आय व्ही एड्स प्रसार थांबू शकतो त्याचप्रमाणे कलंक व भेदभावाच्या घटना घडणार नाही रुग्णांना सहानुभूतीपूर्वक वागविले जाईल असे सांगितले.
श्री विकास वाळुंज समुपदेशक आयसीटीसी पारनेर यांनी युवकांना एचआयव्ही बाबतची स्थिती जाणून घेण्याचे आवाहन करून आयसीटीसी बद्दलची माहिती दिली. एच आय व्ही प्रसाराची कारणे, उपाय, गैरसमज, लक्षणे याबद्दलची माहिती दिली.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्स प्रतिबंध व निरोगी राहण्यासंदर्भात व रुग्णांना सकारात्मक वागणूक देण्यासंदर्भातची शपथ देण्यात आली त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रॅलीची सुरुवात करून ढवळपुरी गावात, मुख्य बाजारपेठ ,ग्रामपंचायत भागातून मार्गक्रमण करत पुन्हा महाविद्यालय प्रांगणात समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शेख जमील यांनी केले तर सुदृढ आरोग्य संदर्भात मार्गदर्शन करून आभार प्रदर्शन प्राचार्य किरण कारंडे यांनी केले कार्यक्रमास प्रा. अतुल मोरे, प्रा सागर वाव्हळ, प्रा अनिल पवार, प्रा सौ जयश्री भोंडवे, प्रा.कू. कावेरी पानसरे , प्रा. कावेरी गवते इत्यादी उपस्थित होते .
कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी श्री राधाकिशन पाटोळे, लेखापाल तसेच महाविद्यालयातील शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले.