विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने समाजात बदनामी झाली. त्यातून मानसिक त्रास झाल्याने एका तरुणाने अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतःला पेटून घेत आत्महत्येचा प्रयत्न बुधवारी केला होता. ऋषिकेश विठ्ठल डव्हाण (वय 18, रा. बाभुळगाव ता. राहुरी) असे पेटून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. या युवकाचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
पेटून घेतल्यामुळे ऋषिकेश सुमारे 75 टक्के भाजला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथील ससून रूग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार दरम्यान आज या युवकाचा मृत्यू झाला.
युवकाच्या मृत्यूमुळे बाभूळगावात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी बाभूळगावात मोठा पोलिस बंदोबस्त मागविला आहे.






